।। श्री गणेशाय नमः ।।
वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे | सहज हवन होते नाम घेता फुकाचे ||
जीवन करि जीवित्व अन्न हे पूर्ण ब्रम्ह | उदरभरण नोहे जाणिजे यज्ञ कर्म|| १ ||
जनी भोजनी नाम वाचे वदावे | आतु आदरे गद्य घोषे म्हणावे ||
हरी चिंतने अन्न सेवीत जावे | तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे || २ ||
उपासनेला दृढ चालवावे | भूदेव संतासी सदा नमावे |
सत्कर्मयोगे वय घालवावे | सर्वामुखी मंगल बोलवावे || ३ ||
ॐ सह नाववतु | सह नौ भुनक्तु | सहवीर्य करवावहै | तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै ||
|| ॐ शांति: शांति: शांति: ||
पूर्वी हा श्लोक म्हणूनच जेवणाला सुरुवात केली जात असे. जमिनीवर पाट मांडून
त्यावरच जेवायला बसण्याची पद्धत होती. जेवणापूर्वी ताटाला नमस्कारही केला
जायचा. यासारख्या अनेक पद्धती पूर्वी प्रकर्षाने पाळल्या जायच्या. आता
काळानुसार या पद्धती पाळल्या जातातच असं नाही. आजकाल बरेचदा हॉटेलमध्ये
जेवायला जातो किंवा पार्टी, गेट टूगेदर यासारख्या कार्यक्रमांच्या वेळी
अनेक लोकांबरोबर एकत्र जेवताना आपण काही गोष्टी आवर्जून पाळल्या पाहिजेत.
जेवायला सुरुवात करण्यापूर्वी
हात धुऊन जेवायला बसा. जेवायला बसल्यावर
तुमच्या डिशसोबत ठेवलेला नॅपकिन तुमच्या मांडीवर पसरून ठेवा. सर्वप्रथम
टिश्यू पेपरने डिशेस पुसून घ्या. जेणेकरून जेवताना घास सांडला तरी तुमचे
कपडे खराब होणार नाहीत. तुम्ही मागवलेला पदार्थ चवीसाठी दुस-या व्यक्तीला
द्यायचा असेल, तर तुमचा पदार्थ उष्टा करण्याआधी दुस-याला घास मोडून द्यावा
आणि नंतर आपण खायला सुरुवात करावी. वेटरने ताटात अन्न वाढलं की, त्याला
‘थँक यू’ म्हणायचं. ती व्यक्ती आपल्याला जेवण वाढत असते, त्यामुळे
त्याच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे. तुम्हाला कितीही भूक लागली
असली तरी आपल्याबरोबर असलेल्या सगळ्या व्यक्तींना जेवण वाढून झाल्याशिवाय
खायला सुरुवात करू नका.
चमचे, डिशेस्चा योग्य वापर करा
बरेचदा आपण घेतलेल्या डिशबरोबर त्या त्या
पद्धतीचे चमचे दिले जातात. म्हणजे डोसा खाण्यासाठी काटय़ाचा चमचा दिला
जातो, चायनीज डिश घेतलीत तर चॉपस्टिक्स दिल्या जातात. चॉपस्टिक्स म्हणजे
केवळ दोन काठय़ा असतात. तुम्ही म्हणाल दोन सरळ काटय़ांनी अन्न खाणं कसं
शक्य आहे? पण मुलांनो, लोक त्या चॉपस्टिक्सने चक्क भातसुद्धा खातात. बरेचदा
एकच डीश मागवली तरी दोन वेगवेगळ्या आकाराच्या डिश दिल्या जातात. अशा वेळी
रोटी कोणत्या डिशमध्ये घेऊन खायची आणि भाजी कोणत्या डिशमध्ये ठेवायची याची
तारांबळ उडते. त्यामुळे हॉटेलमध्ये जायच्या आधी आई-बाबांकडून या गोष्टींची
माहिती करून घ्या. जेवण झाल्यावर दोन चमचे डिशमध्ये ठेवताना ते उपडे करून
‘७’च्या आकारात ठेवा.
जेवताना व्यवस्थित बसा
जेवताना खुर्चीला पाठ टेकवून ताठ बसा.
व्यवस्थित न सांडवता खाता येईल, अशा पद्धतीने जेवणाचं टेबल आणि तुमची
खुर्ची यामध्ये योग्य अंतर ठेवा. खुर्चीवर बसल्यानंतर पाय जमिनीला टेकत
नसतील तर ते सरळ आणि स्थिर ठेवा. जर जेवताना शिंक किंवा खोकला आला तर तोंड
बाजूला करा. पटकन तोंडावर रुमाल ठेवा आणि नंतर ‘एक्स्क्युज मी’ किंवा
‘सॉरी’ म्हणा.
तोंडात घास असताना बोलू नका!
हॉटेलमध्ये जाताना बरेचदा आपण आपले
मित्र-मैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत जातो. अशा वेळी गप्पांची चांगलीच
मैफल जमते. पण मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा. तोंडात घास असताना कधीही
बोलू नये. कारण तोंडात घास असताना बोलल्यामुळे तोंडातले अन्नाचे कण बाहेर
उडतात. शिवाय अन्न तोंडात असताना बोलल्यामुळे तोंडाचा आवाज होतो.
आपल्याबरोबर जेवायला बसलेल्या व्यक्तींना यामुळे त्रास होऊ शकतो. त्यामुळे
छोटे घास घ्या. तोंड बंद ठेवूनच घास चावा आणि तोंडातला घास संपल्यानंतरच
बोला.
साभार : http://prahaar.in/chottam-mottam/135404, http://chetann.blogspot.in/2013/02/blog-post_15.html
साभार : http://prahaar.in/chottam-mottam/135404, http://chetann.blogspot.in/2013/02/blog-post_15.html
No comments:
Post a Comment